तैपेई शहर,
Taiwan government's support for Indians तैवानमध्ये भारतीय कामगारांविरोधात करण्यात आलेल्या वादग्रस्त प्रचारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एका स्थानिक राजकीय उमेदवाराच्या निवडणूक पोस्टरमधील भेदभावपूर्ण संदेशावर तैवान सरकारने तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्टपणे सांगितले की, देश कोणत्याही प्रकारच्या वंशवाद आणि भेदभावाला समर्थन देत नाही. काओशुंग सिटी कौन्सिलच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवार ली हंग-यी यांच्या प्रचार पोस्टरमुळे हा वाद उफाळून आला. या पोस्टरमध्ये भारतीय कामगारांच्या प्रवेशाला विरोध दर्शवण्यात आला होता. पोस्टरमध्ये भारतीयांबाबत आक्षेपार्ह आशयासोबत काही चित्रांचाही वापर करण्यात आला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर अनेक स्तरांवरून संताप व्यक्त करण्यात आला.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भारतातील तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्राने अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात काही व्यक्तींनी केलेली वक्तव्ये किंवा प्रचार साहित्य हे तैवान सरकारचे अधिकृत मत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तैवान हा लोकशाही, विविधता आणि सर्वसमावेशकतेवर विश्वास ठेवणारा देश असल्याचेही त्यांनी नमूद केले. तैवान प्रशासनाने भारतीय नागरिकांबाबत कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह, वंशवाद किंवा भेदभाव सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. भारत आणि तैवान यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमधील लोकसंपर्क आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, या पोस्टरचा व्हिडिओ प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक इयान माइल्स चेओंग यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला. काही ठिकाणी भारतीय कामगारांना तैवानमध्ये आणण्याच्या धोरणालाही विरोध होत असल्याचे समोर आले आहे. तैवानने अलीकडेच भारतातून मोठ्या प्रमाणात कामगारांना रोजगारासाठी आणण्यासंदर्भात करार केला आहे. उद्योग आणि उत्पादन क्षेत्रातील कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र या निर्णयावरून स्थानिक राजकारण तापल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.