नवी दिल्ली,
virat-kohli : टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता फक्त एकदिवसीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळतो. विराटने आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९,००० हून अधिक धावा केल्या आहेत. या काळात त्याने जगभरातील गोलंदाजांना नामोहरम केले आहे, पण काही गोलंदाज असेही होते ज्यांच्याविरुद्ध कोहलीला संघर्ष करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विराट कोहलीने एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आणि त्याला त्रास देणाऱ्या तीन गोलंदाजांची नावे घेतली.
आरसीबीच्या एका लीडरशिप इव्हेंटदरम्यान विराट कोहलीने खुलासा केला की, त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत काही गोलंदाजांनी त्याला खूप त्रास दिला आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमधील प्रत्येकी एका गोलंदाजाचे नाव घेतले, जो त्याच्यासाठी सर्वात आव्हानात्मक ठरला. आरसीबी इनोव्हेशन लॅब इव्हेंटमध्ये कोहली म्हणाला की, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचा सर्वाधिक सामना आदिल रशीदशी झाला. कसोटी क्रिकेटमध्ये, इंग्लंडमध्ये जेम्स अँडरसनने त्याला खूप त्रास दिला. टी-२० फॉरमॅटमध्ये, सुनील नरेनने मला खूप त्रास दिला आहे.
कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, कोहलीने इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा उल्लेख केल्याने कोणालाही आश्चर्य वाटले नसेल. कोहली म्हणाला की, इंग्लंडमधील या परिस्थितीत अँडरसनने त्याला कसोटी सामन्यांमध्ये खूप त्रास दिला आहे. अँडरसनने कोहलीला कसोटी सामन्यांमध्ये सात वेळा बाद केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, विराट इंग्लंडचा अनुभवी फिरकी गोलंदाज आदिल रशीदला अग्रस्थानी ठेवतो. रशीदने कोहलीला अनेक वेळा आपल्या जाळ्यात अडकवले आहे. त्याने कोहलीला एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच वेळा बाद केले आहे. जेव्हा टी-२० क्रिकेटचा विषय आला, तेव्हा विराट कोहलीने लगेचच वेस्ट इंडिजच्या महान गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेनचा उल्लेख केला. नरेनने कोहलीला टी-२० क्रिकेटमध्ये चार वेळा बाद केले आहे.