उल्हासनगर,
Ulhasnagar Conversions उल्हासनगरमध्ये एका महिलेने फसवणूक आणि जबरदस्तीच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका २७ वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, एका व्यक्तीने स्वतःला हिंदू असल्याचे सांगून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले आणि नंतर लग्नानंतर तिच्यावर धार्मिक चालीरीती स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीसह त्याच्या दोन भावांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण सात जणांविरोधात विविध कलमांखाली कारवाई सुरू केली आहे.
गोमांस खाण्यासाठी दबाव
तक्रारीनुसार, आरोपीने २०१९ मध्ये ‘विजय’ या नावाने ओळख करून दिली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि त्यानंतर त्याने महिलेला बिहारमधील आपल्या गावी नेले. तिथेच त्याने आपली खरी ओळख उघड करत मुस्लिम पद्धतीने विवाह केल्याचा आरोप महिलेने केला आहे.महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर तिच्यावर मुस्लिम परंपरा स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. बुरखा आणि हिजाब वापरण्यास भाग पाडणे, हिंदू देवतांची पूजा करण्यास विरोध करणे आणि गोमांस खाण्यासाठी दबाव आणल्याचे गंभीर आरोप तिने केले आहेत. आरोपी हिंदू देवतांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तक्रारीमध्ये आरोपीच्या कुटुंबीयांचाही उल्लेख करण्यात आला आहे. महिलेने सांगितले की, पतीसह त्याचे भाऊ, आई-वडील आणि इतर नातेवाईकांकडूनही तिच्यावर धार्मिक रितीरिवाज स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात होता. महिलेच्या मते, मलाच्या जन्मानंतर तिचा छळ अधिक वाढला. त्याचदरम्यान आरोपीने दुसरे लग्न केल्याचेही समोर आले. याला विरोध केल्यानंतर मुस्लिम धर्मात एकापेक्षा अधिक विवाहांना परवानगी असल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. यानंतर कुटुंब उल्हासनगरमध्ये परतले, मात्र तेथेही मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच राहिल्याचा दावा करण्यात आला आहे. अखेर त्रास सहन न झाल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.