मेळघाटातील मजुरांच्या विस्थापनावर चर्चा

    दिनांक :20-May-2026
Total Views |
वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाचा पुढाकार
अधिवेशनात तीन ठराव झाले पारित
 
अमरावती, 
'Vanvasi Gramin Mazdoor Sangh'  मेळघाटातील कामगार तथा मजुरांच्या होत असलेल्या प्रचंड प्रमाणातील विस्थापनावर भारतीय मजदूर संघ अंतर्गत येत असलेल्या विदर्भ प्रांत वनवासी ग्रामीण मजदूर संघाने सखोल चर्चा सुरू केली आहे. हे विस्थापन थांबविण्यासाठी महासंघाने पुढाकार घेतला आहे. मेळघाटमधून हजारोंची संख्येने आदिवासी मजूर रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या जिल्ह्यात व राज्यांमध्ये विस्थापित होतात. त्या ठिकाणी त्यांचे शोषण होते अनेक ठिकाणी अन्याय, अत्याचार केले जातात. या गंभीर प्रश्नाकडे विदर्भ प्रांत वनवासी ग्रामीण मजदूर संघ लक्ष घालणार आहे, असे प्रतिपादन असंघटित क्षेत्राचे केंद्रीय प्रभारी व भारतीय मजूदूर संघाचे नेते जयंतराव देशपांडे यांनी धारणी येथे आयोजित अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात केले. १६ व १७ मे रोजी धारणी येथील हरीगोविंद छात्रावास येथे हे अधिवेशन झाले.
 
 
mazadoor sangh
 
'Vanvasi Gramin Mazdoor Sangh'  या अधिवेशनानंतर अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय कार्य समितीची बैठक सुद्धा झाली. या अधिवेशनाला अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राधूसिंगजी भाबर, असंघटित क्षेत्राचे प्रभारी दिल्ली निवासी जयंतराव देशपांडे, राष्ट्रीय महामंत्री कृष्णकुमार बैगा, राष्ट्रीय संयुक्त महामंत्री प्रकाश बोदडे, धारणीचे माजी तालुका संघचालक रतनलाल परिहार यांची उपस्थिती होती. अधिवेशनात तीन ठराव पारित झाले. त्यात, मेळघाट मधून मजूर विस्थापित होऊ नये याकरिता शासन व प्रशासनाने याच भागात त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करावी. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून पुनर्वसित झालेल्या आदिवासी बंधू करिता पंधरा लाख देण्याचे शासनाने कबूल केले होते, त्यामध्ये केवळ दहा लाख रुपये दिल्या गेले.४०२ लोकांचे प्रत्येकी पाच लाख बाकी आहेत, सरकारने या पैशांची व्यवस्था करावी. प्रवासी मजूर किंवा विस्थापित होत असलेल्या कामगार व मजुरांवर होणार्‍या अन्याय, अत्याचारावर प्रतिबंध लावण्यासाठी सरकारने प्रवासी श्रमिक आयोगाची निर्मिती करावी या तीन ठरावांचा त्यात समावेश आहे. प्रास्ताविक, परिचय, आभार राष्ट्रीय महामंत्री प्रकाश बोदडे यांनी केले. ठरावावर विस्तृत चर्चा झाली व आगामी तीन महिन्यांमध्ये विस्थापित मजूरांसोबत संपर्क साधण्यात येईल व त्यावर तातडीने मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्यात येणार आहे.
 
 
प्रदेश कार्यकारणी जाहीर
धारणी येथील अधिवेशनात अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाची प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून शिवराम धांडे (चिखलदरा), प्रदेश कार्याध्यक्ष सुरपाल रावत (जळगाव), महामंत्री नंदू बामणे, संयुक्त महामंत्री राजू बामणे (बुलढाणा), उपाध्यक्ष शेमती कासदेकर, अशोक केदार, प्रदेश मंत्री जयाताई खंडारे (धारणी), कोषाध्यक्ष चिमकर, प्रदेश सदस्य म्हणून संगीता दहीकर, ब्यानसिंग बारेला, सत्यनारायण बंडीवार, श्याम गंगराडे, क्षमा चौकसे, लोकेश धनेवार, मनोहर चौबीसा यांची नियुक्ती करण्यात आली.