पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती अभियान
नागपूर,
मध्य रेल्वे, नागपूर विभागातर्फे Ticketing System Railvan App रेलवन अॅपद्वारे तिकीट प्रणालीचा प्रसार तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी नागपूर, सेवाग्राम आणि पुलगाव या प्रमुख रेल्वे स्थानकांसह अजनी येथील सीवायएम कार्यालयात विशेष जनजागृती अभियान घेण्यात आले. अभियाना दरम्यान प्रवासी आणि रेल्वे कर्मचार्यांना ‘रेलवन अॅप’च्या वापराचे फायदे आणि सुविधा यांची माहिती देण्यात आली. रेल्वे अधिकार्यांनी सांगितले की, या अॅपच्या मदतीने प्रवासी अनारक्षित तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकिटे जलद व सोयीस्कर पद्धतीने करू शकतात. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील लांब रांगांमध्ये उभे राहण्याची गरज कमी होते. हे अॅप कॅशलेस आणि पेपरलेस तिकीट प्रणालीलाही प्रोत्साहन देते.
Ticketing System Railvan App डिजिटल तिकीट प्रणालीमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होते, तसेच कागदाचा वापरही मोठ्या प्रमाणात कमी होतो. ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागतो. प्रवाशांना डिजिटल तिकीट प्रणाली ही स्मार्ट, पर्यावरणपूरक आणि त्रासमुक्त पद्धत म्हणून स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. रेल्वे अधिकार्यांनी सांगितले की, रेलवन अॅपवर रेल्वेशी संबंधित विविध सेवा आणि आवश्यक प्रवासविषयक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होते. पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत प्रवाशांना एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्वतःच्या पुनर्वापर करता येणार्या पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी आणि स्थानक परिसर स्वच्छ व परिसर हिरवागार ठेवण्यासाठी स्टील, तांबे किंवा इतर शाश्वत पर्यायांचा वापर करण्याचा सल्लाही आला. मध्य रेल्वे, नागपूर विभागाने प्रवाशांना रेलवन अॅपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे, डिजिटल तिकीट प्रणाली स्वीकारण्याचे तसेच प्लास्टिकमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन केले आहे.