मुंबई
Aamir Khan अभिनेता आमिर खान याचा मुलगा जुनेद खान याने ‘महाराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत प्रेक्षकांची दाद मिळवली होती. त्यानंतर मात्र त्याचे ‘लवयापा’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘एक दिन’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. विशेषतः सुमारे २५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘एक दिन’ या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या चित्रपटात जुनैदसोबत अभिनेत्री साई पल्लवी झळकली होती. मात्र चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता आमिर खानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुलाखतीत आमिर खानने चित्रपट अपयशी ठरल्यावर होणाऱ्या मानसिक तणावाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. प्रेक्षक एखादा चित्रपट नाकारतात, तेव्हा ती गोष्ट मनाला खोलवर लागते, असे सांगताना त्याने प्रत्येक चित्रपट हा आपल्या मुलासारखाच असल्याची भावना व्यक्त केली. प्रेक्षक थिएटरमध्ये मनोरंजनाच्या अपेक्षेने येतात आणि जर त्यांना चित्रपट आवडला नाही, तर त्यामागे निर्मात्यांची किंवा कलाकारांचीच काहीतरी चूक असते, असे आमिरने स्पष्टपणे मान्य केले.
“जेव्हा माझा एखादा Aamir Khan चित्रपट दणक्यात आपटतो, तेव्हा मी पूर्णपणे खचून जातो. आम्ही प्रेक्षकांसाठीच चित्रपट बनवत असतो. प्रेक्षक निराश होऊन घरी परतत असतील, तर त्यात त्यांची चूक नसते. आमच्या कामात काहीतरी कमतरता राहिली, याचाच तो अर्थ असतो,” अशा शब्दांत आमिरने आपल्या भावना व्यक्त केल्या.