-अ. भा. मराठी प्रकाशक संघ पुरस्कार जाहीर
नागपूर,
Anil tankasale: 'Jivanagaurav' puraskar अ. भा. मराठी प्रकाशक संघाचा जीवनगौरव पुरस्कार अनिल बुक एजन्सीचे संचालक अनिल टांकसाळे यांना जाहीर झाला आहे. याशिवाय साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, मुद्रित शोधक पुरस्कार विजय सरदेशपांडे यांना प्रदान केला जाणार आहे. अ. भा. मराठी प्रकाशक संघाच्या स्थापनेपासून अर्थात 30 वर्षांपासून जीवनगौरव पुरस्कार, साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार सन 2015 पासून तर गेल्या चार वर्षांपासून मुद्रित शोधक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी 30 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता पुण्यातील सदाशिव पेठेतील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये आयोजित आहे.
पुरस्कारांचे वितरण इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे अ.भा. मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे व प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी सांगितले. अनिल टांकसाळे हे मागील 54 वर्षांपासून पुस्तक विक्री क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी नागपूर व आसपासच्या परिसरात ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून ग्रंथ प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली. पुस्तकप्रेमी वाचकांना उत्तम पुस्तके वाचावयास मिळावीत या उद्देशाने त्यांनी नागपुरात 1972 मध्ये केवळ साहित्य विषयक पुस्तक विक्रीचे दालन सुरू केले.
Anil tankasale: 'Jivanagaurav' puraskar शिक्षण-साहित्य क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून डॉ. न. म. जोशी यांच्याकडे पाहिले जाते. वयाची नव्वदी पार केलेल्या जोशी यांची सत्तरपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ग्रंथसंपदेवर अभ्यास करून चार संशोधकांनी डॉक्टरेट ही पदवी मिळविली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व सिंधी या चारही भाषांमधून त्यांनी लेखन केले आहे. ज्ञाननिष्ठा व सत्यनिष्ठा या तत्त्वाने त्यांची वाटचाल सुरू आहे. विजय सरदेशपांडे यांनी 1962 ते 2025 या कालावधीत विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके व मासिकांमध्ये मुद्रितशोधन केले आहे.