जम्मू,
Bag Seized in Poonch जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. मेंढर सेक्टरमधील बालाकोट फॉरवर्ड भागात राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान शस्त्रे आणि संशयित अमली पदार्थांनी भरलेली एक बॅग जप्त करण्यात आली. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, सीमेपलीकडून तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात विशेष शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान एका झाडाखाली पुरलेली बॅग आढळून आली. सुरक्षा दलांनी खबरदारीचा उपाय म्हणून प्रथम संपूर्ण परिसराची तपासणी केली आणि कोणतेही स्फोटक अथवा आयईडी नसल्याची खात्री केल्यानंतर बॅग बाहेर काढण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या बॅगेत चीनमध्ये बनवलेले पिस्तूल आणि काही संशयास्पद पाकिटे सापडली आहेत. प्राथमिक तपासात या पाकिटांमध्ये अमली पदार्थ असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याची अधिकृत पुष्टी प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच होणार आहे.विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या बॅगेवर ‘लाहोर’ असे लिहिलेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही सामग्री सीमेपलीकडून भारतात पाठवण्यात आल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात अतिरिक्त शोधमोहीम सुरू केली असून, या प्रकरणामागील नेटवर्कचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून, तपास यंत्रणा या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत आहेत. अधिक तपासानंतर आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.