पोलिसांवर दगडफेक...16 जणांना अटक

वांद्रे गरीब नगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम

    दिनांक :21-May-2026
Total Views |
मुंबई
Bandra East Garib Nagar मुंबईतील वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई राबवली जात असून, आता ती निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कालपर्यंत सुमारे 60 टक्के पाडकाम पूर्ण झाले होते, तर आज एकूण 85 टक्के अतिक्रमण हटवण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
 

Bandra East Garib Nagar 
काल संध्याकाळी अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान संतप्त झालेल्या काही स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याचेही समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी कठोर भूमिका घेत 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी 16 जणांना अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये 10 जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
 
 
दगडफेकीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस, रेल्वे संरक्षण दल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या घटनास्थळी तैनात आहेत. एकूण सुमारे 1200 सुरक्षा रक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
 
रेल्वे प्रशासनाने Bandra East Garib Nagar कारवाईदरम्यान बाधित झालेल्या नागरिकांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था केली असून, मदतकार्यही सुरू ठेवले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी सुमारे 500 अनधिकृत अतिक्रमणे हटवली जाणार आहेत.ही जमीन रिकामी झाल्यानंतर वांद्रे टर्मिनसचा विस्तार होणार असून, पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन टाकण्यासाठी जागा उपलब्ध होईल. यामुळे उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची क्षमता वाढण्यास मदत होणार असून, भविष्यात रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे.