हार्दिक पांड्याला बीसीसीआयचा दणका!

सामन्यातील कृतीमुळे दंडाची कारवाई

    दिनांक :21-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
BCCI slaps Hardik Pandya इंडियन प्रीमियर लीगमध्ये हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या कामगिरीपेक्षा मैदानावरील वर्तनामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हार्दिक पांड्यावर दंडात्मक कारवाई करत त्याच्या मॅच फीमधून १० टक्के रक्कम कापण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात ही घटना घडली. आयपीएल प्रशासनाच्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याने सामन्यादरम्यान आचारसंहितेच्या लेव्हल-१ नियमांचे उल्लंघन केले. हे उल्लंघन क्रिकेट साहित्य आणि मैदानावरील उपकरणांच्या गैरवापराशी संबंधित असल्याचे सांगितले गेले आहे.
 
 
hardik
 
सामन्याच्या दुसऱ्या डावातील एका षटकादरम्यान हार्दिक पांड्या रन-अपसाठी परत जात असताना त्याने जोरात विकेटच्या बेल्सना धडक दिली. या कृतीनंतर पंचांनी घटनेची नोंद घेतली आणि नंतर आयपीएल प्रशासनाने त्याच्यावर कारवाई जाहीर केली.दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम आधीच निराशाजनक ठरला आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. KKR विरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने हे लक्ष्य सहज गाठत चार विकेट्स राखून विजय मिळवला. हार्दिक पांड्याने या सामन्यात फलंदाजीत २६ धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीत त्याला यश मिळाले नाही. काही सामने गमावल्यानंतर तो पुन्हा संघात परतला होता, मात्र आता त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.