नवी दिल्ली,
Cockroach Janata Party comeback सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) पुन्हा एकदा इंटरनेटवर दमदार पुनरागमन केले आहे. भारत सरकारच्या निर्देशानंतर एक्सने या गटाचे मुख्य अकाउंट ब्लॉक केल्यानंतर अवघ्या काही तासांतच नव्या नावाने पुन्हा सोशल मीडियावर एन्ट्री करण्यात आली. ‘कॉकरोचेस इज बॅक’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या नव्या हँडलने सुरू होताच सोशल मीडियावर वेगाने लोकप्रियता मिळवली. “कॉकरोच मरत नाहीत” असा संदेश प्रोफाइल बायोमध्ये देण्यात आला असून, या नव्या अकाउंटला केवळ एका तासात २५ हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या मोहिमेमागे राजकीय रणनीतिकार अभिजीत दीपके यांचे नाव चर्चेत आहे. सरकारच्या कायदेशीर आदेशानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे मूळ हँडल ब्लॉक करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर लगेचच नव्या हँडलच्या माध्यमातून या डिजिटल मोहिमेने पुन्हा आपली उपस्थिती दाखवून दिली.दरम्यान, सोशल मीडियावर या गटाची लोकप्रियता झपाट्याने वाढत होती. इंस्टाग्रामवर या पेजला कोट्यवधी फॉलोअर्स मिळाल्याची चर्चा होती. बेरोजगारी, पेपरफुटी आणि तरुणांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अनेक युवकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला होता.
अशी सुरू झाली चळवळ
ही संपूर्ण चळवळ सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान झालेल्या वक्तव्याच्या निषेधातून सुरू झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सोशल मीडियावर ‘कॉकरोच’ हा शब्द मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला आणि त्यावरून विविध मीम्स, पोस्ट्स आणि मोहिमा सुरू झाल्या. वाद वाढल्यानंतर संबंधित वक्तव्याबाबत स्पष्टीकरणही देण्यात आले होते. तरीही अनेक तरुणांनी या मोहिमेला व्यवस्थेविरोधातील प्रतीक म्हणून स्वीकारले. स्वतःला “बेरोजगार आणि नाराज तरुणांचा आवाज” म्हणवणाऱ्या या गटाने न्यायव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेबाबत अनेक मागण्या मांडल्या आहेत. सोशल मीडियावर या नव्या अकाउंटच्या पुनरागमनानंतर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, या मोहिमेची लोकप्रियता आणि प्रभाव किती वाढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.