मुंबई,
Drought over Vidarbha मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर राज्यातील पावसाबाबत मोठा इशारा दिला आहे. यंदा एल निनोचा प्रभाव तीव्र राहण्याची शक्यता असून, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, अशी माहिती सरकारला हवामान विभागाकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मान्सूनच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक असताना शेतकऱ्यांमध्ये यंदाच्या पावसाबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात एल निनोचा परिणाम अधिक जाणवू शकतो. त्यामुळे या भागांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारच्या माहितीनुसार, यंदा राज्यातील दीर्घकालीन सरासरी पाऊस सुमारे ८८ टक्क्यांपर्यंत राहू शकतो. जून महिन्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता असली तरी त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने घटू शकते. शिवाय, पावसाच्या दोन सरींमध्ये मोठे अंतर पडण्याची शक्यता असल्याने पिकांवर ताण निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने जलसंधारण आणि जलयुक्त शिवारच्या कामांना गती देण्याचे आदेश दिले आहेत. पिकांना पाण्याचा ताण जाणवू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने स्वतंत्र नियोजन करावे, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१५ च्या एल निनो वर्षाची आठवण करून देताना सांगितले की, त्या काळात मराठवाड्यात केवळ ६१ टक्के पाऊस झाला होता आणि अनेक भागांना दुष्काळाचा मोठा फटका बसला होता. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी आधीपासून तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, खरीप हंगामासाठी बियाणे, खतांचा पुरवठा, पीककर्ज आणि शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भातही सरकारने तयारी सुरू केली असून, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.