भाववाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ

आंतरराष्ट्रीय संघर्षाचा फटका खाद्यतेल बाजाराला

    दिनांक :21-May-2026
Total Views |
मुंबई
oil price अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे जाणवू लागला असून, त्याचा फटका भारतातील इंधन आणि खाद्यतेल बाजारालाही बसत आहे. इंधन दरांमध्ये झालेल्या वाढीचा थेट परिणाम खाद्यतेलाच्या किमतींवर दिसून येत असून, मागील दोन महिन्यांत खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे.
 

oil price 
बाजारातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे पामतेलासह इतर आयातित खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली आहे. भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करत असल्याने जागतिक बाजारातील चढउतारांचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येतो. सध्या लग्नसराईचा काळ नसल्याने आणि उन्हाळ्यामुळे मागणी तुलनेने कमी असली तरी भाववाढ सुरूच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.भविष्यात पामतेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला असून, येत्या काळात दरवाढीची शक्यता अधिक असल्याचे बाजारातील सूत्रांचे म्हणणे आहे. ही वाढ कायम राहिल्यास त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या मासिक खर्चावर होणार आहे.दरम्यान, पूर्वी भारतात जवस, करडई यांसारख्या तेलबियांचे उत्पादन देशांतर्गत पातळीवर मोठ्या प्रमाणात होत होते. मात्र कालांतराने आयातीत तेलांवर अवलंबित्व वाढल्याने देशांतर्गत उत्पादनाला फटका बसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तेलबिया उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.तेलाच्या दरात आणखी वाढ झाल्यास प्रति लिटर मागे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी काळात खाद्यतेल बाजारात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.