सँटोस,
fifa-world-cup-2026 : फिफा विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच ब्राझीलच्या फुटबॉल संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू नेमार पुन्हा एकदा जखमी झाला असून, त्याच्या फिटनेसबाबत चिंता वाढली आहे. नेमारची नुकतीच ब्राझीलच्या विश्वचषक संघात निवड झाली होती, मात्र आता त्याच्या दुखापतीमुळे तो काही दिवस मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे.
सध्या तो ब्राझीलच्या क्लब सँटोसकडून खेळतो आहे. पोटरीच्या (calf) दुखापतीमुळे तो कोपा सुदामेरिकाना स्पर्धेतील सॅन लोरेन्झोविरुद्धचा घरच्या मैदानावरील सामना खेळू शकला नाही. तरीही क्लबने ही दुखापत फार गंभीर नसल्याचे स्पष्ट केले आहे. क्लबचे डॉक्टर रॉड्रिगो झोगाइब यांनी सांगितले की, नेमार २७ मे रोजी होणाऱ्या विश्वचषकपूर्व सराव सत्रासाठी फिट होण्याची शक्यता आहे.
नेमार पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच राष्ट्रीय संघात सामील होईल, असेही सांगण्यात आले आहे. पुढील सामन्यात डेपोर्टिव्हो कुएंकाविरुद्ध तो मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
नेमारची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अतिशय मोठी आहे. त्याने आतापर्यंत ब्राझीलसाठी १२८ सामने खेळले असून ७९ गोल केले आहेत. ऑक्टोबर २०२३ नंतर तो ब्राझील संघासाठी मैदानात उतरलेला नाही, कारण त्यावेळी उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती.
बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेनसारख्या मोठ्या क्लबमध्ये खेळलेला नेमार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुखापतींशी झुंज देत आहे. सँटोसकडे परतल्यानंतरही त्याने ३८ सामन्यांत १७ गोल केले आहेत.
हा त्याचा चौथा विश्वचषक असणार आहे. याआधी तो २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये खेळला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या ब्राझीलच्या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव सामील होणार आहे. तसेच पेलेनंतर चार वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये ब्राझीलची प्रसिद्ध १० नंबर जर्सी परिधान करणारा तो दुसरा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे.
ब्राझील आपला विश्वचषक प्रवास १३ जून रोजी मोरोक्कोविरुद्ध न्यू जर्सीमध्ये सुरू करणार आहे. त्यानंतर गटात हैती आणि स्कॉटलंडविरुद्ध सामने होणार आहेत. नेमारच्या फिटनेसवरच आता संपूर्ण ब्राझीलचे लक्ष केंद्रित झाले आहे.