पराग मगर
नागपूर,
tea lovers ‘रामटेकवरून बसने नागपूरसाठी निघालेले रामाजी आज दुपारी 1 च्या जवळपास माेरभवन स्थानकावर पाेहाेचले. शासकीय कामासाठी त्यांना जिल्ह्यात जायला उशीर झाला हाेता. पण याही स्थितीत त्यांनी आधी जवळची चहाची टपरी शाेधली आणि उन्हाच्या तप्त झळांत उकळत्या चहावर ताव मारला. इतक्या उन्हाच चहासाठी इतकी तळमळ का असे विचारले असता रामाजी म्हणाले, भाऊ चहा शिवाय तं आपलं पान हलत नाही. गरम चहाच गर्मीले मारते.’
‘खाेकला सतावत असलेला हरिश चहा पिण्यासाठी चहाच्या एका शाॅपवर गेला. त्याने कडक अद्रक चहाची मागणी केली आणि आलं जास्त घालण्याची सूचना केली. पण चहा तयार करणारा उत्तरला, येथे सगळे प्रिमिक्स असतात. त्यामुळे अद्रक प्रिमिक्सच्या चहावर हरिशला समाधान मानावे लागले. या चहाला टपरीच्या वााळलेल्या आल्याच्या चहाची चव नसल्याचे सांगत आता तसा चहा शाेधून लवकर सापडत नसल्याची खंत त्याने केली.’
आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने अनुभवास आलेले हे दाेन्ही प्रातिनिधिक प्रसंग. चहाची तलफ आणि ताे मनासारखा मिळत नसल्यास हाेत असलेली तगमग चहा दिवसानिमित्त काही काही चहा लवर्सशी संवाद साधला असता त्यांनी व्यक्त केली. आता अनेक ब्रांडच्या चहामध्ये केवळ आलं आणि विलायची घालून उकळलेला चहा मिळणे दुरापास्त झाल्याची खंतही अनेक जण व्यक्त करतात.
बऱ्याच कंपन्यांनी आता चहाची ‘दुकानदारी’ सुरू केली आहे. यात प्रत्येक फफ्लेवरचे प्रिमिक्स तयार असते. त्यामुळे सर्वत्र आता एकाच प्रकारचा मसाला चहा आपण पिताेय असे वाटत असल्याचे अनेक जण सांगतात. पण यामध्ये एखाद्या काेपऱ्यात पारंपरिक पद्धतीने चहा विकणारा आता काहीसा दुर्लक्षित झाल्याचेही निदर्शनास येते.
चहा अडकला थर्मासमध्ये
चहा विक्रीचे आता माेठमाेठे आऊटलेट्स तयार झाले आहे. आणि येथे तयार केलेला चहा माेठ्या थर्मासमध्ये ठेवला जाताे. यात ताे बराच वेळ गरम राहत असला तरी त्याची चव बिघडते असे चहाप्रमी सांगतात.
चहा म्हणजे सर्वस्व - मृण्मयी कुळकर्णी
महाराष्ट्रीतील प्रसिद्ध कीर्तनकार असलेल्या मृण्मयी कुळकर्णी- भाटवडेकर यांची समाजमाध्यमांवर असलेली एक ओळख म्हणजे चहाप्रेमी. त्यामुळे चहा दिनानिमित्त चहाविषयी काय वाटते असे विचारले असता त्या म्हणतात, चहा म्हणजे आनंद, चहा म्हणजे वाट पहाणं, चहा म्हणजे गप्पा, चहा म्हणजे मैत्री आणि प्रेमही. चहा म्हणजे विचार, चहा म्हणजे रंगलेली मैफल, चहा म्हणजे जनातलं सगळं, चहा म्हणजे मनातलं थाेडंसं, चहा म्हणजे प्रसन्न सकाळ अन् मनातली संध्याकाळ, चहा म्हणजे दिलासा, चहा म्हणजे विश्वास, चहा म्हणजे निवांतता, चहा म्हणजे जगातलं सगळं आणि चहा म्हणजे सगळ्यातलं जग.