गोंदिया जिल्ह्यात उष्माघाताचा बळी !

    दिनांक :21-May-2026
Total Views |
- देवलगाव येथील ३८ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू
,
अर्जुनी मोरगाव, 
Heatstroke in Gondia District जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २१ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथील शेतमजुराचा शेतात काम करून घरी परत जात असताना वाटेत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विनोद विश्वनाथ राऊत (३८) रा. देवलगाव असे मृत शेतमजूराचे नाव आहे.
 
 
kishan
 
Heatstroke in Gondia District  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिकांसह शेतमजुरांवर उष्णतेचा मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी कष्ट करणार्‍या शेतमजूराच्या मृत्यूची घटना घडल्याने ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात आहे. मृत विनोद राऊत हे रोजंदारीवर शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सध्या रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व बांधणीची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने ते आज गुरुवारी सकाळी एका शेतकर्‍याकडे कामासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास कडक उन्हात काम करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांनी घरी जातो म्हणून निघून आले. मात्र गावात येताच रस्त्याच्या कळेला कोसळले. बराच वेळ ते उन्हात पडून राहिल्याने त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्थानिक आश्रम शाळेतील अधीक्षक वैशाली जांभूळकर यांनी त्यांना माणुसकीचा धर्म जपत तातडीने उपचारासाठी नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार, त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुढील वैद्यकीय व प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. मृत विनोद राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. तेव्हा शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.