हैदराबाद,
Kurchi Taata हैदराबादमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात लोकप्रिय झालेले ‘कुर्ची ताता’ म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद पाशा (वय ६६) यांचे बुधवारी सकाळी अचानक निधन झाले. कृष्णकांत पार्क परिसरात सकाळी फिरायला गेले असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. त्यांना तत्काळ मदत मिळू शकली नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीत स्पष्ट झाले आहे.
मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेल्या तीव्र उन्हाळ्यामुळे व वाढलेल्या तापमानामुळे त्यांना उष्माघाताचा त्रास झाला असावा, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.
मोहम्मद पाशा हे हैदराबादमधील कृष्णकांत पार्क परिसरात भिक्षा मागून साधे जीवन जगत होते. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ‘कुर्ची मडतापेट्टी’ हा संवाद अतिशय हटके शैलीत सादर केला होता. हा संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यांना ‘कुर्ची ताता’ या नावाने ओळख मिळाली. त्यानंतर त्यांच्या या संवादावर आधारित मीम्स, रील्स आणि व्हिडिओंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.
त्यांची लोकप्रियता इतकी Kurchi Taata वाढली की दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास आणि अभिनेता महेश बाबू यांच्या ‘गुंटूर कारम’ या चित्रपटातील गाण्यात या संवादाचा समावेश करण्यात आला. संगीतकार थमन एस यांनी या डायलॉगचा वापर करून गाण्याचा कोरस तयार केला होता, ज्यामुळे त्यांची प्रसिद्धी आणखी वाढली. या लोकप्रियतेनंतर त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत आणि मानधनही मिळाल्याचे सांगितले जाते.लोकप्रियतेनंतरही पाशा यांचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले राहिले. काही वेळा ते वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत राहिले असून, त्यांना काही वेळा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागल्याचेही समोर आले आहे.