बँकिंग जगही हादरलं! स्टँडर्ड चार्टर्ड बँकेतील नोकऱ्या धोक्यात!

    दिनांक :21-May-2026
Total Views |
लंडन,
Jobs at Standard Chartered Bank लंडन-मुख्यालय असलेली प्रमुख बँक स्टँडर्ड चार्टर्ड पुढील चार वर्षांत ७,००० हून अधिक नोकऱ्या कमी करण्याची तयारी करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनचा वाढता वापर करून कार्यक्षमता सुधारण्याचा आणि नफा वाढवण्याचा उद्देश या निर्णयामागे असल्याचे सांगण्यात आले आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, बँकेच्या कॉर्पोरेट विभागांमधील सुमारे १५ टक्के पदे २०३० पर्यंत कमी केली जाणार आहेत. या पुनर्रचनेचा परिणाम जगभरातील सुमारे ५२,००० कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो, तर बँकेकडे एकूण ८२,००० कर्मचारी कार्यरत आहेत.
 
 

chartered bank 
 
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल विंटर्स यांनी सांगितले की, हा निर्णय केवळ खर्च कपातीसाठी नसून मोठ्या तांत्रिक बदलाचा भाग आहे. काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नवीन पदांवर स्थानांतरित करण्याची संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या बदलाचा सर्वाधिक परिणाम चेन्नई, बंगळुरू, क्वालालंपूर आणि वॉर्सा येथील बॅक-ऑफिस केंद्रांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बँक पुढील काळात संपत्ती व्यवस्थापन आणि श्रीमंत ग्राहकांसाठीच्या बँकिंग सेवांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.या पुनर्रचनेनंतर बँकेच्या नफ्यात वाढ होण्याची अपेक्षा असून, २०२८ पर्यंत परतावा १५ टक्क्यांपेक्षा अधिक आणि २०३० पर्यंत सुमारे १८ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, जपानमधील मिझुहो फायनान्शियल ग्रुपनेही पुढील १० वर्षांत ऑटोमेशनमुळे सुमारे ५,००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जागतिक बँकिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असून रोजगार संरचनेत मोठे बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे.