संतप्त ग्रामस्थांनी केरोडा ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

    दिनांक :21-May-2026
Total Views |
सावली, 
Keroda Gram Panchayat. तालुक्यातील केरोडा ग्रामपंचायतीमधील कथित भोंगळ कारभार, ग्रामसभांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि गावाच्या विकासकामांबाबतची उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकत तीव्र निषेध नोंदविला.
 
 
keroda
 
सुमारे 2 हजार 200 लोकसंख्या असलेल्या केरोडा गावात विविध शासकीय योजनांमधून ग्रामविकासासाठी निधी उपलब्ध होत असतानाही त्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गावातील मूलभूत समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना ग्रामपंचायतीकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात येणार्‍या ग्रामसभांना सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक सचिव हेच अनुपस्थित राहत असल्याने ग्रामसभेचे महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे गावकर्‍यांच्या प्रश्नांना न्याय मिळत नसून प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला.
 
 
 
Keroda Gram Panchayat.  तसेच ग्रामपंचायतीत पारदर्शकता नसून विविध योजनांच्या निधीबाबत माहिती दिली जात नसल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गावातील समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, ग्रामसभांना जबाबदार अधिकारी उपस्थित राहावेत आणि विकासनिधीचा हिशोब ग्रामस्थांसमोर मांडावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी दिलीप चलाख, विजय उंदीरवाडे, प्रशांत डोलणे, ढीवरु भुरसे, अंकुश सोदुलवार, सौरभ पिपरे, संकेत वड्डेलवार, कैलास सहारे आदी उपस्थित होते.