लातूर,
Latur Pediatrician Arrested देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणातकेंद्रीय अन्वेषण ब्युरोने मोठी कारवाई करत लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा गंभीर आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. या प्रकरणात पालकाला झालेली ही पहिली अटक असल्याने संपूर्ण तपासाला नवे वळण मिळाले आहे. डॉ. शिरुरे हे लातूरमधील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक असून, सीबीआयचे पथक मागील काही दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांच्या रुग्णालयात दीर्घ चौकशी केली आणि काही महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन तसेच डिजिटल पुरावे जप्त केले.
आरोपी मोटेगावकरशी संबंध
प्राथमिक तपासात त्यांचे आरोपी शिवराज मोटेगावकर आणि इतर संशयितांशी संबंध असल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सीबीआयच्या तपासातून पेपरफुटीचे संपूर्ण रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमधील काही सदस्यांमार्फत प्रश्न आधीच बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे प्रश्न हाताने लिहून किंवा डिजिटल स्वरूपात आरोपींपर्यंत पोहोचवले जात होते. पुढे हेच प्रश्न आणि उत्तरे पैशांच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून काही डिजिटल डेटा हटवण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. मात्र तांत्रिक मदतीच्या साहाय्याने सीबीआयने तो डेटा पुन्हा मिळवला असून त्यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, शिक्षक आणि मध्यस्थांवर कारवाई होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. आता या प्रकरणातील अटक आणि डिजिटल पुरावे समोर आल्यानंतर पेपरफुटीचे जाळे देशातील अनेक भागांपर्यंत पसरले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.