नवी दिल्ली,
mastermind of the pahalgam attack पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने दाखल केलेल्या चार्जशीटमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या तपासातून संपूर्ण कट पाकिस्तानात बसून रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, लष्कर-ए-तैयबा आणि TRF शी संबंधित दहशतवादी सैफुल्लाह उर्फ साजिद जट्ट उर्फ ‘लंगडा’ हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
NIA ने चार्जशीटमध्ये साजिद जट्टला मुख्य आरोपी क्रमांक-१ म्हणून नमूद केले आहे. तपासानुसार, तो पाकिस्तानातील लाहोरमध्ये बसून संपूर्ण ऑपरेशन रिमोट कंट्रोल पद्धतीने चालवत होता. दहशतवाद्यांच्या हालचालींपासून ते हल्ल्याच्या प्रत्येक टप्प्याचे निर्देश थेट पाकिस्तानातून दिले जात होते.
या तपासात प्रथमच साजिद जट्टची अधिकृत ओळखही निश्चित करण्यात आली आहे. चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या छायाचित्राची ओळख काश्मीरमध्ये राहणाऱ्या त्याच्या मुलाकडून करून घेण्यात आली. मुलाने तोच आपला वडील असल्याची पुष्टी केली असून, NIA या पुराव्याला अत्यंत महत्त्वाचे मानत आहे.
साजिद जट्ट हा पाकिस्तानातील कसूर भागातील रहिवासी असून, २००५ मध्ये घुसखोरी करून तो काश्मीरमध्ये पोहोचला होता. दक्षिण काश्मीरमध्ये त्याने स्थानिक तरुणांचे ब्रेनवॉश करून OGW म्हणजेच ओव्हर ग्राउंड वर्कर्सचे मोठे नेटवर्क उभे केले. २००५ ते २००७ या काळात तो काश्मीरमध्ये सक्रिय होता. याच काळात त्याने स्थानिक महिलेशी विवाह केला आणि नंतर पाकिस्तानात परतला.
NIA च्या माहितीनुसार, गोळी लागल्यामुळे त्याचा एक पाय निकामी झाला होता आणि तो कृत्रिम पाय वापरत होता. याच कारणामुळे त्याला ‘लंगडा’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
तपास यंत्रणेनुसार, २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर लष्कर-ए-तैयबाने आपली रणनीती बदलली आणि TRF (The Resistance Front) या संघटनेला पुढे केले. साजिद जट्टने या संघटनेची उभारणी, सोशल मीडिया नेटवर्क तयार करणे आणि जमिनीवर मॉड्यूल सक्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. TRF वर खोऱ्यातील अनेक टार्गेट किलिंग आणि मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागाचे आरोप आहेत.
चार्जशीटनुसार, पहलगाम हल्ला हा पूर्णपणे नियोजित कट होता. १५ आणि १६ एप्रिल रोजी साजिदने फैजल जट्ट उर्फ सुलेमान, हबीब उर्फ छोटू आणि हमजा अफगानी या तीन दहशतवाद्यांना बैसरन खोऱ्याची रेकी करण्यासाठी पाठवले होते. परिसरातील सुरक्षा व्यवस्था, पर्यटकांची ये-जा आणि संभाव्य लक्ष्यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला होता.
हल्ल्याच्या दिवशी लाहोरमधून रिअल-टाइम लोकेशन आणि सूचनादेखील दिल्या जात होत्या. दहशतवाद्यांची प्रत्येक हालचाल, लपण्याची ठिकाणे आणि पळून जाण्याचे मार्ग पाकिस्तानातूनच ठरवले जात असल्याचा दावा NIA ने केला आहे.
या प्रकरणात स्थानिक नेटवर्कची भूमिकाही समोर आली आहे. चार्जशीटमध्ये परवेज आणि बशीर अहमद या दोन स्थानिक व्यक्तींचा उल्लेख असून, त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर मदत पुरवल्याचा आरोप आहे. २१ एप्रिल रोजी दहशतवादी जंगलाच्या मार्गाने पहलगाममध्ये पोहोचले असता, या दोघांनी त्यांना एका झोपडीत लपवून ठेवले होते.
तपासात असेही समोर आले की २२ एप्रिल रोजी या दोघांनी दहशतवाद्यांना पुन्हा बैसरन पार्क परिसरात पाहिले होते, मात्र त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली नाही.mastermind of the pahalgam attack NIA च्या मते, योग्य वेळी माहिती मिळाली असती तर २६ निष्पाप लोकांचे प्राण वाचू शकले असते.
हल्ल्यानंतर TRF ने ‘Kashmir Fight’ या टेलिग्राम चॅनेलद्वारे जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर त्यांनी चॅनेल हॅक झाल्याचा दावा करत माघार घेतली. तपासात हे चॅनेल पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधून चालवले जात असल्याचे स्पष्ट झाले. आणखी एक चॅनेल रावळपिंडीमधून ऑपरेट होत असल्याची माहितीही समोर आली आहे.
मृत दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनच्या तपासातही पाकिस्तान कनेक्शनचे ठोस पुरावे मिळाले आहेत. एक मोबाईल लाहोरमधून तर दुसरा कराचीमधून खरेदी करण्यात आला होता.
NIA च्या चार्जशीटनंतर हे स्पष्ट झाले आहे की पहलगाम हल्ला ही स्थानिक घटना नसून पाकिस्तानातून चालवण्यात आलेले एक सुनियोजित दहशतवादी ऑपरेशन होते. ‘लंगडा’सारख्या मास्टरमाइंडच्या माध्यमातून सीमापार सक्रिय असलेले हे नेटवर्क भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.