मुझफ्फराबाद,
Mastermind of Pulwama Attack Eliminated पाकिस्तानच्या मुझफ्फराबाद परिसरात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक हमजा बुरहान याचा गोळ्या झाडून खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळीबार केला असून, घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हमजा बुरहान, ज्याचे खरे नाव अर्जमंद गुलजार दार असल्याचे सांगितले जाते, हा अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा कमांडर मानला जात होता. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, तो दीर्घकाळ भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय होता आणि विशेषतः दक्षिण काश्मीरमध्ये तरुणांना कट्टरतावादाकडे वळवण्यात त्याची मोठी भूमिका होती.

मूळचा जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असलेला हमजा काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात गेला होता. तेथे गेल्यानंतर तो अल-बद्रमध्ये सामील झाला आणि पुढे संघटनेचा ऑपरेशनल कमांडर बनला. सुरक्षा यंत्रणांच्या मते, पाकिस्तानात बसून तो काश्मीरमध्ये दहशतवादी भरती, निधीपुरवठा आणि शस्त्रसाठा पुरवण्याचे नेटवर्क चालवत होता. भारताच्या गृह मंत्रालयाने २०२२ मध्ये त्याला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले होते. त्याच्यावर पुलवामा आणि इतर भागांत दहशतवादी कारवाया घडवून आणणे, स्थानिक युवकांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि आर्थिक मदत उभी करणे यांसारखे गंभीर आरोप होते.
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, त्याचे नेटवर्क पुलवामा, शोपियान आणि अवंतीपोरा भागात सक्रिय होते. अनेक ग्रेनेड हल्ले, स्फोटकसाठा आणि दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना कट्टरतावादाकडे ढकलण्यामध्येही त्याची भूमिका असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, त्याच्या हत्येमागे नेमके कोण आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेनंतर दहशतवादी नेटवर्कमध्ये खळबळ माजल्याचे बोलले जात आहे.