सुपर एल निनोमुळे मान्सून कमकुवत होणार!

    दिनांक :21-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Monsoon Weakened Due to Super El Niño जागतिक हवामानात पुन्हा एकदा मोठ्या बदलाचे संकेत दिसत असून, यंदा ‘सुपर एल निनो’ची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरातील तापमान सामान्यपेक्षा झपाट्याने वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम जगभरातील हवामानावर, विशेषतः भारतातील मान्सून आणि तापमानावर होऊ शकतो. ‘एल निनो’ ही पॅसिफिक महासागरातील नैसर्गिक हवामान घटना असून, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने जागतिक वाऱ्यांची आणि पावसाची रचना बदलते. या बदलामुळे आशियाई देशांमध्ये पावसाचे प्रमाण घटते, तर काही भागांत तीव्र उष्णता वाढते. भारताचा मान्सूनही याच प्रणालीवर अवलंबून असल्याने त्याचा थेट परिणाम देशातील हवामानावर दिसून येतो.
 
 
el nino and india
महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये तापमान वाढ
हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, सध्या मध्य पॅसिफिक महासागरात तापमानात वाढ होत असून परिस्थिती ‘सुपर एल निनो’च्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. ही स्थिती निर्माण झाल्यास भारतात मान्सून कमकुवत होऊ शकतो आणि अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम उन्हाळ्यातील तापमानावर होऊन उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि दीर्घकाळ टिकू शकतात. उत्तर भारत, मध्य भारत, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
या परिस्थितीमुळे शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांत १९८२, १९९७ आणि २०१५ मध्ये अशाच प्रकारच्या सुपर एल निनो परिस्थितीचा अनुभव जगाने घेतला होता, ज्यावेळी अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक तापमानवाढीमुळे ही नैसर्गिक प्रक्रिया अधिक तीव्र होत असून, भविष्यात हवामानातील अनिश्चितता आणखी वाढू शकते. त्यामुळे हवामान विभाग आणि संशोधन संस्था परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.