जिल्हाधिकारी विकास मीना यांची माहिती
मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेला गती
यवतमाळ,
'mukhyamantri baliraja shet raste yojana' ग्रामीण भागातील शेत व पांदण रस्त्यांचे मजबुतीकरण करून वाहतुकीस चालना देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामांना गती मिळाली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात एकूण 6 हजार 836 शेत पांदण रस्ते निश्चित करण्यात आले. सुमारे 11 हजार 540 किमी लांबीच्या रस्त्यांसाठी अंदाजे 1502.88 कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
त्यासाठी राज्य शासन, जिल्हा नियोजन, खनिज प्रतिष्ठानकडून निधी उपलब्ध केला जाणार असून त्यामाध्यमातून शेत पांदण रस्त्यांची कामे केली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा कार्यकारी समिती तसेच विधानसभा क्षेत्र समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 13 समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. योजनेसाठी विविध यंत्रसामुग्री व पाईप पुरवठ्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीमार्फत विधानसभा मतदारसंघनिहाय दर निश्चित करण्यात आले असून 53 निविदाधारकांपैकी 52 निविदाधारकांनी कमी दराने काम करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यांच्या संमतीपत्राच्या आधारे पात्र कंत्राटदारांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे.
'mukhyamantri baliraja shet raste yojana' जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय रस्त्यांच्या संख्येनुसार, यवतमाळ विधानसभा क्षेत्रात 1753 किमी लांब 1,113 रस्ते निश्चित करण्यात आले असून त्यासाठी अंदाजे 262.95 कोटी रुपये, राळेगाव विधानसभा क्षेत्रात राळेगाव, कळंब व बाभुळगाव तालुक्यात 1850 किमी लांब 1099 रस्त्यांसाठी अंदाजे 248.70 कोटी रुपये लागणार आहेत. आर्णी विधानसभा क्षेत्रात आर्णी, केळापूर व घाटंजी तालुक्यात 1580 किमी लांब 672 रस्त्यांसाठी अंदाजे 221.20 कोटी रुपये, वणी विधानसभा क्षेत्रात वणी व मारेगाव, झरीजामणी तालुक्यात 2297 किमी लांब 1662 रस्त्यांसाठी अंदाजे 342.66 कोटी रुपये लागणार आहेत.
दिग्रस विधानसभा क्षेत्रात दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यात 2344 किमी लांब 1162 रस्त्यांसाठी अंदाजे 289.37 कोटी रुपये, पुसद विधानसभा क्षेत्रात 1211 किमी लांब 876 रस्त्यांसाठी अंदाजे रक्कम 87.60 कोटी रुपये आणि उमरखेड विधानसभा क्षेत्रात उमरखेड व महागाव तालुक्यात 504 किमी लांब 252 रस्ते निश्चित करण्यात आले असून त्यासाठी अंदाजे 50.40 कोटी रुपये लागणार आहेत.
यासाठी निधीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. या मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदणरस्ते कामांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेत पांदणरस्ते मजबूत होणार असून शेती व्यवस्थेला चालना मिळणार आहे.