मुंबई
electric robotic boats मुंबईकरांच्या अभिमानाचा आणि शहराच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग असलेल्या अरबी समुद्रकिनाऱ्यांवर वाढत्या प्रमाणातील कचऱ्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि बांद्रा परिसरात सागरी कचरा संकलनासाठी दोन इलेक्ट्रिक, रोबोटिक,मानवरहित बोटी तैनात करण्यात आल्या असून या उपक्रमामुळे किनारपट्टी स्वच्छतेला नवे परिमाण मिळाले आहे.
दररोज सुमारे 80 ते 90 किलोग्रॅम इतका तरंगता कचरा या बोटींच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढला जात असल्याची माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे. प्लास्टिक, पिशव्या आणि इतर तरंगत्या घनकचऱ्याचे संकलन करून त्याचे वर्गीकरण केले जाते आणि पुढील प्रक्रियेसाठी पुनर्वापर यंत्रणेकडे पाठवले जाते.
या प्रकल्पामध्ये रिमोट-कंट्रोलवर चालणाऱ्या अत्याधुनिक बोटींचा समावेश आहे. मानवी श्रम आणि वेळखाऊ प्रक्रिया कमी करून अधिक प्रभावी पद्धतीने कचरा संकलन करणे हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या बोटी दूरवरून नियंत्रित केल्या जात असून किनाऱ्याजवळ तसेच उथळ पाण्यातील कचरा सहजपणे गोळा करू शकतात.या बोटी इलेक्ट्रिक असून बॅटरीवर चालतात. त्यावर सोलर पॅनेलचीही व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ होते आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धतीला चालना मिळते. या बोटींची कार्यक्षम श्रेणी सुमारे 500 मीटरपर्यंत असल्याचेही सांगण्यात आले आहे.किनारी स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने बीएमसीने उचललेले हे पाऊल देशातील महानगरपालिकांसाठी एक आदर्श ठरत असल्याचे मानले जात आहे. या उपक्रमामुळे समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य electric robotic boats टिकून राहण्यास मदत होत असून समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण प्रगती होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा असा अभिनव वापर भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाऊ शकतो, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.