मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाचे विकास लवांडे यांना अटक

    दिनांक :21-May-2026
Total Views |
पुणे,
Vikas Lavande राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे नेते आणि प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायातील कथित “घुसखोरी” संदर्भात त्यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीमुळे निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर घडलेल्या शाईफेक प्रकरणामुळे ते चर्चेत होते. मात्र त्यांच्या अटकेचे नेमके कारण अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
 
Vikas Lavande

 
काही दिवसांपूर्वी लवांडे यांनी सोशल मीडियावर काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध करत “वारकरी संप्रदायात घुसखोरी” झाल्याचा दावा केला होता. या विधानानंतर त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती. त्यानंतर एका घटनेत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक करत समर्थन व्यक्त केले होते.यानंतर संबंधित प्रकरण वाघोली पोलीस ठाण्यात पोहोचले होते आणि लवांडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट अटकेची कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अटकेनंतर त्यांचा एक फोटोही समोर आला असून त्यामध्ये ते पोलिसांसोबत कारमध्ये बसलेले दिसत आहेत.
दरम्यान, या कारवाईवर Vikas Lavande  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली असून ही अटक खोट्या प्रकरणातून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाघोली पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, त्यामुळे परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.लवांडे यांच्या अटकेबाबत आणि पुढील कारवाईबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया तीव्र होण्याची शक्यता असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.