मुंबई
Rohit Pawar राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य समीकरणांवर चर्चा रंगली असून, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर स्पष्ट उत्तर मिळाले आहे. बुधवारी Sharad Pawar यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) स्वतंत्रपणेच आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवणार असल्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
या बैठकीला पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाचे भविष्यातील धोरण, संभाव्य राजकीय आघाड्या आणि विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांवर वरिष्ठांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केल्याचेही सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि नेते जयंत पाटील यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करत विलिनीकरणाचा कोणताही विचार सध्या नसल्याचे ठामपणे सांगितले. शरद पवार यांनी मात्र यावर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही, असे सूत्रांकडून समजते.या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या एका मुलाखतीतील वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला आणखी वेग आला आहे. विलिनीकरण झाल्यास आपली भूमिका काय असेल, या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार यांनी “भाजपसोबत जाणार नाही, इतर पर्याय निवडेल” असे स्पष्ट केले. मात्र काँग्रेससोबत जाण्याच्या शक्यतेबाबत त्यांनी थेट भाष्य करणे टाळले.रोहित पवार यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट भविष्यात कोणती राजकीय दिशा निवडणार, याबाबत उत्सुकता वाढली असतानाच सध्या मात्र पक्षाने स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना तात्पुरता विराम मिळाल्याचे मानले जात आहे.