पुणे
NEET paper leak देशभरात गाजलेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात आता तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात अटकेत असलेले शिवराज मोटेगावकर आणि मनीषा मांधरे यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दोघांच्या हस्ताक्षर नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी न्यायालयाची परवानगी मागण्यात आली आहे.
नीटसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. सुरुवातीच्या तपासानंतर केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कठोर भूमिका घेत तपास सीबीआयकडे सोपवला होता.सीबीआयने आतापर्यंत केलेल्या तपासात अनेक आरोपींना अटक केली असून, सध्या मोटेगावकर आणि मांढरे हे दोघेही कोठडीत आहेत. तपास यंत्रणेच्या सूत्रांनुसार, दोघांच्या हस्ताक्षरांचे नमुने एनटीएच्या महत्त्वाच्या कागदपत्रांशी तसेच बँक व्यवहारांमधील स्वाक्षऱ्यांशी जुळतात का, याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे प्रकरणातील पुराव्यांची शास्त्रीय पडताळणी अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.
लातूरमधील NEET paper leak ‘रेणुकाई करिअर सेंटर’शी संबंधित असलेला शिवराज मोटेगावकर याला यापूर्वी पुण्यातून ताब्यात घेण्यात आले होते. प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, त्याने परीक्षेच्या काही दिवस आधीच प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांच्या मते, स्वतः वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची योजना आणि कुटुंबीयांशी संबंधित शैक्षणिक उद्दिष्टांमुळे या प्रकरणाला वळण मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे नीट परीक्षेच्या विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने तपासाची गती वाढवली आहे. सीबीआयच्या नव्या निर्णयामुळे प्रकरणातील पुरावे अधिक स्पष्ट होतील आणि पुढील कायदेशीर कारवाईला दिशा मिळेल, असे मानले जात आहे.सध्या दोन्ही आरोपी सीबीआयच्या कोठडीत असून, हस्ताक्षर नमुन्यांच्या फॉरेन्सिक अहवालावर पुढील तपासाची दिशा अवलंबून राहणार आहे.