टॅलिन,
Only India can stop Russia रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन युद्धामुळे जगभरात चिंता वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी होत असून, युद्ध थांबवण्यासाठी विविध देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गुस त्साहकना यांनी भारताबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या मते, रशियावर प्रभाव टाकून युद्धविराम घडवून आणण्याची क्षमता भारताकडे आहे. विशेषतः भारत आणि रशियातील मजबूत संबंध लक्षात घेता भारताची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

भारत आणि रशियामधील दीर्घकालीन रणनीतिक आणि राजनैतिक संबंधांमुळे जगाचे लक्ष आता भारताकडे लागले आहे. नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यातील जवळच्या संबंधांचा उल्लेख करत एस्टोनियाच्या मंत्र्यांनी भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यांनी असेही सांगितले की, युरोपला आता लवकरात लवकर शांतता हवी आहे आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. त्यामुळे भारताने मध्यस्थीची भूमिका निभावल्यास सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच 2027 मध्ये होणाऱ्या युक्रेन पुनर्बांधणी परिषदेत भारताने सहभागी व्हावे, असे निमंत्रणही त्यांनी दिले. दरम्यान, भारताने आतापर्यंत या युद्धप्रकरणी संतुलित भूमिका घेत संवाद आणि शांततेवर भर दिला आहे. त्यामुळे भविष्यात भारत या संघर्षात अधिक सक्रिय मध्यस्थी करणार का, याकडे आता आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.