पुणे
Pune gang war पुण्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा गँगवॉरच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले असून शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील जुने वैर नव्या हिंसक वळणावर गेले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या दीड वर्षांपूर्वी झालेल्या हत्येनंतर आंदेकर गट आणि कोमकर तसेच संबंधित गटांमध्ये सुरू झालेला संघर्ष आता सलग हल्ले आणि हत्यांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.
वनराज आंदेकर यांच्या हत्येमागे सोम्या गायकवाड आणि कोमकर गटाचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. या हत्येनंतर प्रतिशोधाच्या भावनेतून आंदेकर गटाकडून संबंधित आरोपींच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात असल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या घटनेत समीर काळेचा भाऊ गणेश काळे याचाही खून करण्यात आला. तर बुधवारी आकाश म्हस्केच्या भावावर अक्षय म्हस्केवरही हल्ला झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनांमुळे पुण्यातील Pune gang war गँगवॉर पुन्हा एकदा तीव्र झाले असून आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह अनेक महत्त्वाचे सदस्य सध्या तुरुंगात असतानाही बाहेरच्या घटनांवर नियंत्रण ठेवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. तुरुंगात असूनही बाहेर सलग हल्ले आणि हत्या घडवून आणल्या जात असल्याने पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता कोमकर कुटुंबीयांकडून गंभीर आरोप करण्यात आले असून बंडू आंदेकर तुरुंगात बसूनच बाहेरच्या घटनांचे नियोजन करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गणेश कोमकर यांच्या पत्नी कल्याणी कोमकर बोलताना खळबळजनक वक्तव्य करत जेलमधून फोन कॉल्स आणि बैठकांच्या माध्यमातून नियोजन सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच या सर्व घडामोडींमध्ये बाहेरचे काही लोक मध्यस्थी करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.या आरोपांमुळे पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष अधिक गंभीर व गुंतागुंतीचा होत असल्याचे दिसत आहे. एकीकडे सलग घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा या संपूर्ण साखळीचा तपास अधिक तीव्र करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर या घटनांचा वाढता ताण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.