सावधान! बनावट भरतीचे रॅकेट उघड

    दिनांक :21-May-2026
Total Views |
पुणे
fake job racket पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने राज्यातील बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या नावाचा गैरवापर करत बनावट आणि समांतर भरती रॅकेट चालवले जात असल्याचे समोर आले असून या घोटाळ्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
 

fake job racket 
या प्रकरणाचा पर्दाफाश माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला असून, त्यांनी या संपूर्ण रॅकेटची सखोल चौकशी करून उच्चस्तरीय तपास करण्याची मागणी केली आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या रॅकेटद्वारे बेरोजगार उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आले. एका उमेदवाराकडून तब्बल ४५ लाख रुपये घेतल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
फसवणुकीसाठी आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बनावट कागदपत्रांचा वापर केला. पुणे महापालिकेचे हुबेहूब दिसणारे लेटरहेड, शिक्के आणि लोगो तयार करून उमेदवारांना नियुक्तीपत्रे, प्रशिक्षण आदेश आणि वर्क ऑर्डर दिल्याचे उघड झाले आहे. फसवणूक अधिकृत वाटावी यासाठी पालिकेच्या मुख्य इमारतीजवळील एका नामांकित हॉटेलमध्ये खोट्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आल्याचेही समोर आले आहे.या प्रकरणात शिवानंद पाटील, नमिता बनसोडे आणि राजेंद्र खेडेकर यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यासाठी महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या घोटाळ्यात महापालिकेतील काही अंतर्गत कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.
काही महिन्यांनंतरही fake job racket  नोकरी न मिळाल्याने उमेदवारांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली असता, आरोपींकडून पुन्हा बनावट कागदपत्रे देण्यात आली. काहींना धनादेश देण्यात आले, मात्र ते बँकेत वटले नाहीत. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेक उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला आहे. संपूर्ण साखळीचा शोध घेऊन या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास आता वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.