नागपूर,
Railway Flying Squad मध्य रेल्वेच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या सतर्कता आणि तत्पर कारवाईमुळे ट्रेन क्रमांक १२२९६ मध्ये नियमित तिकीट तपासणीदरम्यान दोन अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली. ही घटना नागपूर बैतूल दरम्यान घडली. विशेषत: कोच एस/२ मध्ये नियमित तिकीट तपासणी करत असताना फ्लाइंग स्क्वॉडचे मुख्य तिकीट निरीक्षक पी. के. डिंकर यांना एक १७ वर्षीय मुलगा आणि १६ वर्षीय मुलगी विनातिकीट प्रवास करताना आढळले. चौकशी दरम्यान या दोन्ही अल्पवयीन मुलांनी ते प्रयागराज येथील घरातून पळून बेंगळुरूकडे जात असल्याचे सांगितले.
Railway Flying Squad सविस्तर आणि चौकशी दरम्यान मुलांनी विवाह करण्याच्या उद्देशाने घर सोडल्याचे सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिकीट निरीक्षक पी. के डिंकर यांनी तात्काळ मुलाच्या मेव्हण्याशी संपर्क साधला. मुलीच्या पालकांनी दाखल केलेल्या पोलिस तक्रारीनंतर मुलाच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन दोन्ही अल्पवयीन मुलांना पुढील कारवाई आणि देखभालीसाठी चाइल्ड हेल्पलाइन प्रतिनिधीच्या उपस्थितीत सुरक्षितपणे रेल्वे पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले.