मुंबई,
Raj Thackeray Acquitted महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज यांना 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास 18 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने राज ठाकरे आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पुरेसे आणि ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. हे प्रकरण 2008 मध्ये रेल्वे भरती परीक्षेदरम्यान घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित होते. त्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेने कार्यकर्त्यांनी मुंबई आणि उपनगरांतील काही रेल्वे स्थानकांवर आंदोलन केले होते. कल्याण, दादर, अंधेरी आणि डोंबिवली परिसरात परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण, दगडफेक आणि तोडफोड झाल्याचे आरोप करण्यात आले होते. रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाल्याचाही दावा करण्यात आला होता.

या घटनेच्या काही दिवस आधी राज ठाकरे यांनी रेल्वे भरती प्रक्रियेत स्थानिक मराठी तरुणांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या भाषणामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यातून हिंसाचार घडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांच्याविरोधात दंगल भडकवणे, समाजात वैमनस्य निर्माण करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.मात्र न्यायालयीन सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांनी आपण घटनास्थळी उपस्थित नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच आपल्यावरचे आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला होता. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने सरकारी पक्षाकडून ठोस पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे नमूद करत सर्व आरोपींची मुक्तता केली. दरम्यान, या निकालानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळातही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.