मुंबई
Raja Shivaji अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुख याचा बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, प्रदर्शनाच्या २० व्या दिवशीही सिनेमाची कमाई स्थिर असल्याचे चित्र आहे. देशासह परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ‘राजा शिवाजी’ने जगभरात १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. त्यातच ‘राजा शिवाजी’मधील भव्यदिव्य मांडणी, प्रभावी अभिनय आणि दमदार दिग्दर्शनामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. परिणामी, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड निर्माण केली.
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या आठवड्यात ‘राजा शिवाजी’ने तब्बल ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही सिनेमाने २४.३० कोटी रुपये कमावत आपली घोडदौड कायम ठेवली. तिसऱ्या आठवड्यातदेखील चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.चित्रपटाने १५ व्या दिवशी १.४५ कोटी रुपये, १६ व्या दिवशी २.७० कोटी रुपये, १७ व्या दिवशी ३.४५ कोटी रुपये, १८ व्या दिवशी १.१५ कोटी रुपये आणि १९ व्या दिवशी १.३० कोटी रुपयांची कमाई केली. बुधवारी म्हणजेच २० व्या दिवशी चित्रपटाने आणखी १.१० कोटी रुपयांची भर घातली. यामुळे भारतातील एकूण कमाई आता ८८.१० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
सध्या ‘राजा शिवाजी’ १०० कोटींच्या Raja Shivaji टप्प्यापासून अवघ्या १२ कोटी रुपयांच्या अंतरावर आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास मराठी चित्रपटसृष्टीत १०० कोटींचा गल्ला जमवणारा हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.दरम्यान, चौथ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई कायम राहते का आणि ‘राजा शिवाजी’ आणखी कोणते विक्रम आपल्या नावावर करतो, याकडे आता मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.