फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेरमतदान,कडेकोट सुरक्षेत मतदान सुरू

    दिनांक :21-May-2026
Total Views |
फाल्टा,
falta assembly constituency पश्चिम बंगालमधील फाल्टा विधानसभा मतदारसंघात आज (२१ मे) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत फेरमतदान पार पडत आहे. राज्यातील या संवेदनशील मतदारसंघात एकूण २८५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू असून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय मतदानावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनद्वारेही देखरेख केली जात आहे.
 
फाल्टा विधानसभा मतदारसंघात
 
 
या मतदारसंघात यापूर्वी २९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले होते. मात्र, निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी आणि अनियमिततेचे आरोप समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने २ मे रोजी ती निवडणूक रद्द करून फेरमतदानाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज पुन्हा नव्याने मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.
फाल्टा विधानसभा मतदारसंघात एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढत भाजपचे देवांशू पांडा, काँग्रेसचे अब्दुल रझाक मोल्ला आणि सीपीआयएमचे शंभू नाथ कुर्मी यांच्यात मानली जात आहे. दरम्यान, टीएमसीचे उमेदवार जहांगीर खान यांनी निवडणुकीपूर्वीच माघार जाहीर केली होती. तरीही त्यांचे नाव ईव्हीएमवर कायम असल्याने निवडणूक प्रक्रियेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या मतदानावेळी काही ठिकाणी मतदान केंद्रांपर्यंत मतदारांना पोहोचू न दिल्याच्या तक्रारी तसेच ईव्हीएम संदर्भातील अनियमिततेचे आरोप समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर यंदा सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर आठ निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.falta assembly constituency तसेच कोणत्याही तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी ३० जलद प्रतिसाद पथके कार्यरत आहेत. या मतदारसंघात एकूण सुमारे २.३६ लाख मतदार असून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.