कालेश्‍वर येथे सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला प्रारंभ

    दिनांक :21-May-2026
Total Views |
सिरोंचा, 
Saraswati Antya Pushkar Festival सिरोंच्या मुख्यालयपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेला गोदावरी, प्राणहिता आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेल्या कालेश्‍वर येथे आजपासून सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला प्रारंभ झाला. तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू, देवादाय विभागाच्या मंत्री कोंडा सुरेखा तसेच कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पहाटे 5.43 वाजता कांची पीठाधिपतींच्या हस्ते पवित्र पुष्कर स्नान करण्यात आले. त्यानंतर विधिवत मंत्रोच्चारात अंत्य पुष्कर सोहळ्याला लाँचनात्मक सुरुवात करण्यात आली.
 
 
puskar
 
कालेश्‍वर मुक्तेश्‍वर स्वामी मंदिर परिसरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली होती. हर हर महादेव आणि वैदिक मंत्रांच्या घोषात त्रिवेणी संगम परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला होता. तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड तसेच आंध्रप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले. पवित्र स्नान करून कालेश्‍वर मुक्तेश्‍वर स्वामींचे दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. यावेळी मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सरस्वती अंत्य पुष्कर हा अत्यंत पवित्र धार्मिक सोहळा असून मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री कोंडा सुरेखा यांच्या नेतृत्वात तेलंगणा सरकारने व्यापक नियोजन केले आहे. मागील वर्षी झालेल्या सरस्वती आदि पुष्कराच्या अनुभवाच्या आधारे यंदा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांना सतर्क ठेवण्यात आले आहे. हे 12 दिवस अत्यंत पुण्यदायी मानले जातात. या काळात त्रिवेणी संगमात स्नान करून कालेश्‍वर मुक्तेश्‍वर स्वामींचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्य लाभते, असे मानले जाते.
 
 
 
Saraswati Antya Pushkar Festival  या 12 दिवसीय सोहळ्यासाठी राज्य सरकारने तब्बल 30.63 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 21 मे ते 1 जूनदरम्यान होणार्‍या या सोहळ्यासाठी 30 ते 40 लाख भाविक येथे येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन पुष्कर घाट परिसरात चटई व्यवस्था, सावली मंडप आणि ओआरएस पॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाविकांच्या वाहतुकीसाठी 90 विशेष बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून कालेश्‍वर परिसरातील 23 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 245 एकर जागेत सुमारे 1 लाख 70 हजार वाहनांच्या पार्किंगची सुविधा उभारण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने घाट परिसर, मंदिर क्षेत्र आणि पार्किंग भागात 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नदी परिसरात एसडीआरएफ पथके, सुरक्षा बोटी, लाईफ रिंग्स आणि विशेष बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय 50 ते 100 प्रशिक्षित गज-ईतगारांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे सतत नदी परिसरात दक्ष राहणार आहेत.