नागरिकांचे प्रश्न वाऱ्यावर अधिकारी बैठकीत सट्टाच्या आकड्यात खुश

व्हिडिओ व्हायरल, कारवाईची मागणी तीव्र

    दिनांक :21-May-2026
Total Views |
सिंधुदुर्ग
Sawantwadi Panchayat Samiti सावंतवाडी पंचायत समितीच्या शासकीय बैठकीदरम्यान गंभीर चर्चा सुरू असताना बांधकाम विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्याने मोबाईलवर मटक्याचे आकडे पाहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 

Sawantwadi Panchayat Samiti, 
गुरुवारी सावंतवाडी पंचायत समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असताना सर्वसामान्यांचे प्रश्न, विकासकामे आणि शासकीय योजनांवर चर्चा सुरू होती. मात्र बैठकीदरम्यान एका अधिकाऱ्याचे लक्ष मोबाईल स्क्रीनवर खिळलेले असल्याचे निदर्शनास आले.
 
 
शेजारील उपस्थितांनी पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकारी मटक्याचे आकडे पाहत असल्याचे समोर आले. त्यानंतर काहींनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर उपसभापती गौरव मुळीक यांनी सभागृहात नाव न घेता कडक शब्दांत तंबी दिल्याचे समजते. शासकीय बैठकीतील शिस्त आणि गांभीर्य राखण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.दरम्यान, या घटनेनंतर नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अशा बेजबाबदार वर्तनामुळे शासकीय कामकाजाची प्रतिमा मलिन होत असल्याची टीका केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.