सेलू,
sindi market committee महाराष्ट्र राज्य कृषी पणन संचालनालयाच्या निर्देशानुसार, सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यापारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) आणि शेतमालाची खरेदी-विक्री करणार्या सर्व घटकांना वैध परवान्याशिवाय व्यापार न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम ५ (ड) नुसार थेट पणन (डायरेट मार्केटिंग), खाजगी बाजार किंवा ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी बाजार समितीचा वैध परवाना असणे बंधनकारक आहे. परवाना नसतानाही अनेक ठिकाणी अनधिकृत व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्याने, पणन संचालक शरद जरे यांनी या प्रकरणी कडक पवित्रा घेतला आहे.
कोणत्याही व्यापारी संस्थेला किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला (एफपीओ) बाजार समितीची पूर्वपरवानगी अथवा वैध परवाना असल्याशिवाय खरेदी-विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही. जे व्यापारी नियमांचे पालन करून वैध परवाना धारण करतील, त्यांना बाजार समितीकडून कोणतेही बाजार शुल्क आकारले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही प्रशासनाने दिली आहे. या सूचनेनंतरही जर कोणी विनापरवाना व्यवसाय करताना आढळल्यास, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बाजार समितीचे सभापती केशरीचंद बाळाराम खंगारे आणि सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र भांडारकर यांनी सर्व संबंधित घटकांना तातडीने आपल्या परवान्याची पडताळणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.sindi market committee ज्या व्यापार्यांकडे किंवा संस्थांकडे परवाना नाही, त्यांनी त्वरित बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून परवाना प्रक्रिया पूर्ण करावी. बाजार समितीच्या या धडक निर्णयामुळे शेतमाल व्यापारात अधिक पारदर्शकता येणार असून, अनधिकृत व्यापार्यांवर वचक बसेल आणि शेतकर्यांची फसवणूक थांबून त्यांचे हित जपण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र, या बाजार समिती प्रशासनाच्या इशार्यामुळे व्यापारीवर्गांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे