ठाणे,
Thane fire accident ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गजबजलेल्या गावदेवी भाजी मार्केट परिसरात गुरुवारी (२१ मे) पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि परिसरातील अनेक दुकाने तसेच गोडाऊन जळून खाक झाले. या घटनेत आग विझवण्याच्या प्रयत्नात दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पहाटेच्या शांत वेळी अचानक मार्केट परिसरातून धुराचे लोट दिसू लागले. त्यानंतर काही मिनिटांतच आगीने संपूर्ण परिसर व्यापला. कपडे, प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. अरुंद गल्ल्यांमुळे तसेच दाट धुरामुळे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला सुरुवातीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच Thane fire accident ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक पाच अग्निशमन गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, या मोहिमेदरम्यान अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे (वय ४३) आणि रात्रपाळीवर कार्यरत सुरक्षा रक्षक काळू गाडेकर (वय ५३) हे दोघेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. धुरामुळे गुदमरून आणि होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. दोघांनाही तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पहाटेची वेळ असल्याने मार्केटमध्ये नागरिकांची वर्दळ कमी होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.या आगीत कपडे आणि इतर वस्तूंच्या दुकानांसह गोडाऊनचे मोठे नुकसान झाले असून व्यापाऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.