नवी दिल्ली/मुंबई
UPSC 2027 exam केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वर्ष २०२७ साठीचा अधिकृत परीक्षा कॅलेंडर जाहीर केला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या वेळापत्रकामुळे नागरी सेवा, भारतीय वन सेवा, एनडीए, सीडीएस यांसह विविध महत्त्वाच्या परीक्षांचे नियोजन करणाऱ्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कॅलेंडरमध्ये एकूण सुमारे २७ विविध परीक्षांच्या संभाव्य तारखा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
या जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, नागरी सेवा (Civil Services) पूर्व परीक्षा २०२७ ही २३ मे २०२७ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेतून आयएएस, आयपीएस आणि आयएफएससारख्या प्रतिष्ठित सेवांसाठी उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाते. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा ऑगस्ट २०२७ पासून सुरू होणार असून ती अनेक दिवस चालणार आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) यांची पहिली परीक्षा एप्रिल २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) देखील एप्रिल २०२७ मध्ये होणार असून त्याद्वारे भारतीय लष्कर, UPSC 2027 exam नौदल आणि वायुदलातील अधिकारी पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे.आयोगाच्या या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन अधिक अचूक पद्धतीने करता येणार आहे. परीक्षा तारखा, अधिसूचना प्रसिद्धी आणि अर्ज प्रक्रियेची रूपरेषा आधीच उपलब्ध झाल्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.दरम्यान, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण परीक्षा कॅलेंडर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी वेळोवेळी अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या घोषणेमुळे देशभरातील स्पर्धा परीक्षार्थींमध्ये तयारीच्या दृष्टीने नव्याने गती निर्माण झाली असून २०२७ च्या भरती प्रक्रियेबाबत अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.