मुझफ्फराबाद,
Who was the terrorist Hamza Burhan? पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात हमजा बुरहान उर्फ अर्जुमंद गुलजार दार याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तो पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जात होता आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर बराच काळ होता. हमजा बुरहान हा अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा स्वयंघोषित कमांडर होता. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया, भरती आणि हल्ल्यांचे कट रचण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे होते. २०१७ मध्ये उच्च शिक्षणाच्या नावाखाली तो पाकिस्तानात गेला आणि नंतर दहशतवादी नेटवर्कमध्ये सक्रिय झाला, असा आरोप त्याच्यावर आहे.
“मास्टर रिक्रूटर” म्हणून ओळख
भारत सरकारने २०२२ मध्ये त्याला UAPA कायद्यांतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले होते. अधिकृत माहितीनुसार, तो तरुणांची भरती, त्यांचे कट्टरतावादीकरण आणि शस्त्र पुरवठ्याच्या नेटवर्कमध्ये सक्रिय होता. दक्षिण काश्मीरमध्ये त्याने आपले नेटवर्क विस्तारून अनेक तरुणांना दहशतवादी कारवायांकडे वळवले, असेही सांगितले जाते. २०२१ मध्ये त्याने अल-बद्रपासून वेगळे होत “लोन वुल्फ वॉरियर्स” नावाचे स्वतंत्र नेटवर्क तयार केल्याची माहिती आहे. या संघटनेवर बाहेरील नागरिक आणि काश्मिरी पंडितांवर हल्ल्यांचे कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून त्याला “मास्टर रिक्रूटर” म्हणून ओळखले जात होते.
अल-बद्र ही पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना असून तिची स्थापना १९९८ मध्ये झाली आहे आणि भारत सरकारने २००२ मध्ये तिच्यावर बंदी घातली आहे. जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करून पाकिस्तानमध्ये विलीन करणे हे तिचे घोषित उद्दिष्ट मानले जाते. या संघटनेचे नेटवर्क पाकिस्तानच्या मानसेहरा, मुझफ्फराबाद आणि खैबर पख्तुनख्वा भागांमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जाते.सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, अल-बद्रचे संबंध पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि जमात-ए-इस्लामीशी जोडले जातात. तसेच ही संघटना अनेकदा लष्कर-ए-तैबा आणि जैश-ए-मोहम्मदसाठी आडोसा म्हणून काम करत असल्याचा आरोपही केला जातो. अल-बद्रवर जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा आरोप असून आत्मघाती हल्ले, शस्त्रांची तस्करी आणि भरती नेटवर्कमध्ये ती सक्रिय असल्याचे मानले जाते. अलीकडच्या काळात या संघटनेतील अनेक दहशतवादी ठार झाले असले तरी ती पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. हमजा बुरहानची हत्या या संपूर्ण दहशतवादी नेटवर्कमधील अंतर्गत संघर्ष आणि बदलत्या परिस्थितीशी जोडली जात असल्याचेही सांगितले जात आहे.