हिंगणघाट,
illegal felling trees शहरातील यशवंतनगर परिसरातील बुलडोझर कारवाईनंतर आता अवैध वृक्षतोड केल्याचा नवा वाद निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने बिल्डर आशिष जाना यांना नोटीस बजावत नपची पूर्वपरवानगी न घेता तब्बल १४ झाडांची विनापरवानगी कत्तल केल्याचा ठपका ठेवला आहे. वृक्षांची कत्तल केल्यामुळे पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये संताप व्यत केला जात असतानाच आता पालिकेकडून बिल्डर जाना यांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे.
यशवंतनगर येथील शेजारील जागा खरेदी केल्यानंतर बिल्डर आशिष जाना यांनी भूमापन कार्यालयाकडून कुठलीही अधिकृत हद्द कायम न करता तसेच कोणतीही कायदेशीर नोटीस न देता झोपडपट्टी परिसरातील शौचालय, बाथरूम आणि घरांवरील पके शेड बुलडोजरच्या सहाय्याने पाडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. या कारवाईमुळे परिसरातील महिला, लहान मुले आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आल्याचे नागरिकांनी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी मोकाचौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, नपकडे प्राप्त तक्रारीनंतर वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांनी सदर जागेची पाहणी केली. यावेळी खुल्या जागेवरील आंबा, चिकू, निंबू, सीताफळ, सुबाभूळ, सिसम व पेरू अशा विविध प्रजातींची १४ झाडे मुळासकट तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, या ठिकाणची फत काटेरी बाभूळ व झुडपे तोडण्याची परवानगी संबंधितांना देण्यात आली होती, मात्र इतर झाडांचा परवानगी अर्जात कुठलाही उल्लेख नसल्याचेही स्पष्ट झाले. या प्रकरणी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण अधिनियम १९७५ तसेच महाराष्ट्र अध्यादेश २०२४ अंतर्गत प्रति झाड ५० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद असल्याचे नगर परिषदेकडून नमूद करण्यात आले आहे.illegal felling trees संबंधितांना २४ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश या वादातीत प्रकरणी देण्यात आले आहे. अन्यथा, दंडात्मक कारवाईसोबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारासुद्धा पालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
यशवंतनगर येथील अतिक्रमण व बुलडोझर कारवाईनंतर आधीच तापलेल्या वातावरणात आता वृक्षतोड प्रकरणाची भर पडल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी नगरपालिका पुढे कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.