जम्मू,
Winter is coming again in Kashmir उत्तर भारतातील अनेक राज्ये सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत असताना काश्मीरमध्ये अचानक झालेल्या हिमवृष्टीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले असताना, जम्मू-काश्मीरच्या उंच डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसाने वातावरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अनेक उंच भागांमध्ये मे महिन्यातच हिमवृष्टी झाली असून, गुलमर्ग, गुरेझ खोरे, झोजिला पास आणि राझदान पास परिसर पुन्हा बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकले गेले आहेत. काही ठिकाणी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असून, पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे.
दरम्यान, दिल्लीत तापमान ४६ अंशांच्या जवळ पोहोचले आहे, तरलखनौ, जयपूर आणि इतर अनेक शहरांमध्ये उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील थंड वातावरण पर्यटकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.गुलमर्ग येथे पर्यटकांनी बर्फवृष्टीचा आनंद घेत स्कीइंग आणि बर्फातील खेळांचा मनमुराद आनंद लुटला. अनेक पर्यटकांनी मे महिन्यातील या हिमवृष्टीला अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगितले. काही भागांमध्ये पावसामुळे तापमान १० ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.डल सरोवर परिसरातही वातावरणात मोठा बदल झाला असून, सततच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. श्रीनगर आणि अनंतनागमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडत असून, स्थानिक नागरिकांनी पुन्हा उबदार कपडे बाहेर काढले आहेत.
मात्र, या अवकाळी बदलामुळे काही अडचणीही निर्माण झाल्या आहेत. झोजिला परिसरातील रस्ते निसरडे झाल्याने श्रीनगर-लेह महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. तसेच, जोरदार वारे आणि पावसामुळे सफरचंद बागांचे आणि उभ्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये ढगाळ वातावरण, हलका पाऊस, मेघगर्जना आणि काही उंच भागांमध्ये हिमवृष्टी सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने पर्यटक आणि प्रवाशांना डोंगराळ भागात प्रवास करताना काळजी घेण्याचा इशाराही दिला आहे.