काँग्रेस जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून ‘तापले वातावरण’

    दिनांक :21-May-2026
Total Views |
यवतमाळ, 
Yavatmal District Congress जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. काँग्रेस कार्यकर्ते मोहंमद आसिम अली यांनी या नियुक्तीवर फेरविचार करण्यात यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. अ‍ॅड. सचिन नाईक मागील 18 वर्षांपासून काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर कार्य करत आहेत. त्यांनी युवक काँग्रेसचे निवडणूक आयुक्त, राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव म्हणून काम केले आहे.
 
 
naik
 
याशिवाय अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आणि अनेक लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये विविध राज्यांत निरीक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पडली आहे. मागील तीन वर्षांपासून ते महाराष्ट्रात कार्यरत आहेत. सध्या महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अ‍ॅड. सचिन नाईक कार्यरत आहेत, आणि त्यांच्याकडे प्रांताध्यक्षांच्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. अ‍ॅड. नाईक आपल्या अठरा वर्षांच्या राष्ट्रीय राजकीय प्रवाहामध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाचशेच्यावर जिल्ह्यांमध्ये पक्षकार्यानिमित्त गेले आहेत. त्यांचा हा अनुभव पाहून पक्षाने त्यांना यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे.
 
 
मात्र, या नियुक्तीवर आसिम अली यांनी नियुक्तीचा जाहीर निषेध करत पक्ष नेतृत्वाने या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. सचिन नाईक यांच्याकडे आवश्यक संघटनात्मक अनुभव व जनाधार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आजपर्यंत कोणतीही मोठी निवडणूक लढवलेली नाही तसेच यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये त्यांचा प्रभाव किंवा जनसंपर्क दिसून येत नाही. अशा व्यक्तीला जिल्ह्यासारखी महत्त्वाची जबाबदारी देणे हे पक्ष संघटनेसाठी नुकसानकारक ठरू शकते, असाही आक्षेप त्यांनी नोंदवला आहे.
 
 
 
Yavatmal District Congress  याउलट डॉ. मोहंमद नदीम यांसारख्या वरिष्ठ, अनुभवी आणि जनाधार असलेल्या नेत्याला डावलण्यात आले. डॉ. नदीम यांनी नगर परिषद, विधानसभा यांसह अनेक निवडणुका लढवल्या आहेत. ते जनतेशी थेट जोडलेले नेते असून अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यांना केवळ अल्पसंख्याकातून येत असल्यामुळे डावलण्यात आले, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वांनी या नियुक्तीवर तत्काळ फेरविचार करावा, आणि योग्य, अनुभवी, जनाधार असलेल्या तसेच सामाजिक न्यायाच्या भावनेचे प्रतिनिधित्व करणाèयाची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून पक्षाची विचारधारा, विश्वासार्हता आणि सामाजिक समतोल कायम राहील, असे आसिम अली यांनी म्हटले आहे. एकूणच काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदावरून चांगलेच राजकारण तापल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.