पीएम श्री जि.प.विद्यालयात शून्य सावली दिवस संपन्न
कारंजा लाड,
Zero Shadow Day आपली सावली कायम आपल्यासोबत असते, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र, वर्षातून दोन वेळा असा एक क्षण येतो, जेव्हा ही सावली देखील आपली साथ सोडते. या अद्भूत भौगोलिक आणि वैज्ञानिक घटनेचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून देण्यासाठी पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय, कामरगाव येथे शून्य सावली दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
२० मे रोजी जिल्हा परिषद विद्यालयाच्या प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमप्रमुख गोपाल खाडे, नीता तोडकर व दिपाली खोडके यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयोगांचे आयोजन केले.विद्यार्थ्यांनी काचेवर तसेच जमिनीवर विविध वस्तू ठेवून त्यांच्या सावल्यांचे निरीक्षण केले. जमिनीवर ठेवलेल्या वस्तूंची सावली अदृश्य झाल्यासारखी दिसत होती, तर काचेवर ठेवलेल्या वस्तूंची सावली काचेच्या खाली स्पष्ट दिसून येत होती. त्यामुळे सावली पूर्णपणे नाहीशी होत नसून ती वस्तूच्या अगदी तळाशी पडते, म्हणून ती दिसत नाही, हे विद्यार्थ्यांना प्रयोगातून समजावून सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पृथ्वीची सूर्याभोवतीची गती, उत्तरायण-दक्षिणायण, सूर्याची बदलणारी स्थिती आणि त्यातून निर्माण होणार्या भौगोलिक घटनांची माहिती देण्यात आली. शून्य सावली दिवस हा केवळ एक प्रयोग नसून विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि जिज्ञासा वाढवणारा उपक्रम असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
Zero Shadow Day विज्ञान पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगितल्यास विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होते, तसेच अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक विचार करण्याची सवय लागते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसाचे वैज्ञानिक आणि भौगोलिक घटनेचा आनंद घेण्याकरता विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून ‘सावली गायब होण्यामागील विज्ञान’ समजावून घेतले आणि हा दिवस त्यांच्या दृष्टीने संस्मरणीय ठरला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता शिक्षक वृंद विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.