भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'सिद्धिविनायक मंदिर कॉरिडोर'चा मार्ग मोकळा

    दिनांक :22-May-2026
Total Views |
मुंबई
Siddhivinayak temple मुंबई येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरातील बहुप्रतीक्षित सिद्धिविनायक कॉरिडोर प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, येत्या २५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ करण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळणार असल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 

Siddhivinayak temple corridor 
मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॉरिडोर प्रकल्पामुळे मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुसूत्र होणार असून भाविकांच्या गर्दीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. विशेषतः मंगळवार, संकष्टी चतुर्थी आणि विविध सण-उत्सवांच्या काळात निर्माण होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून रस्त्यांचे सुशोभीकरण, पादचारी मार्गांची निर्मिती, भाविकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा व्यवस्था, भूमिगत पार्किंग तसेच अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ दर्शन अनुभव मिळावा, या उद्देशाने संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपत आधुनिक सुविधांचा समतोल राखण्याचा प्रयत्न या प्रकल्पात करण्यात येणार आहे.
या कॉरिडोरच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी आणि जागा हस्तांतरणाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे प्रत्यक्ष कामांना आता वेग येणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ४७० ते ५०० कोटी रुपयांच्या दरम्यान अपेक्षित असून पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे ७८ ते ९३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. हा कॉरिडोर उज्जैन कॉरिडोरच्या धर्तीवर विकसित केला जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
 
 
 
दरम्यान, भाविकांच्या सोयीसाठी Siddhivinayak temple बेस्ट उपक्रम कडून दादर पश्चिम स्थानक ते सिद्धिविनायक मंदिर मार्गावर नवीन वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा शनिवारपासून २० ते २२ मिनिटांच्या अंतराने उपलब्ध राहणार असून ‘श्री सिद्धिविनायक फेरी ए-८१४’ या नावाने ती चालवली जाणार आहे. या मार्गामुळे दादर रेल्वे स्थानक ते मंदिर परिसरातील प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होणार आहे.या सर्व घडामोडींमुळे सिद्धिविनायक मंदिर परिसराचा कायापालट होण्याची शक्यता असून, आगामी काळात हा परिसर अधिक सुव्यवस्थित आणि भाविकाभिमुख होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.