गुवाहाटी,
Additional Director Caught in ACB गुवाहाटीमध्ये आसाम दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी विभागाने मोठी कारवाई करत आसाम नागरी सेवेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. लचित कुमार दास असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते भूमी अभिलेख विभागात अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होते.मिळालेल्या माहितीनुसार, जमीन विक्रीसाठी आवश्यक असलेला परवाना (एनओसी) देण्याच्या बदल्यात संबंधित अधिकाऱ्याने १ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दक्षता विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट भ्रष्टाचारविरोधी विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.

त्यानंतर विभागाने प्राथमिक चौकशी आणि पडताळणी केल्यानंतर गुवाहाटीतील रूपनगर येथील भूमी अभिलेख संचालनालयात सापळा रचला. गुरुवारी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान अधिकारी आपल्या कार्यालयात ४५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. ही रक्कम मागितलेल्या एकूण १ लाख रुपयांच्या लाचेचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.कारवाईनंतर स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना अटक करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे दक्षता विभागाने स्पष्ट केले आहे. शासकीय कामकाजातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.