मुंबई
Aishwarya Rai बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या उपस्थितीची छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी त्या मुंबई विमानतळावरून फ्रान्सकडे रवाना झाल्या असून त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आराध्या बच्चनही दिसून आली. दोघींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय यांचा यंदाच्या कान्समध्ये सहभाग असेल की नाही, याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र त्यांच्या फ्रान्स प्रस्थानामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विमानतळावर ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच अत्यंत एलिगंट आणि क्लासी लुकमध्ये दिसल्या. त्यांनी ऑल-ब्लॅक पोशाख परिधान केला होता आणि सौम्य स्मितहास्य करत पापाराझींना अभिवादन केले. या वेळी त्यांनी एका लहान चाहत्यासोबत फोटोही काढून उपस्थितांचे मन जिंकले.
ऐश्वर्या यांच्या या प्रवासाकडे Aishwarya Rai केवळ त्यांच्या चाहत्यांचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय फॅशन आणि फिल्म इंडस्ट्रीचेही लक्ष लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्या कान्सच्या रेड कार्पेटवर कोणत्या लुकमध्ये दिसतील, याबाबत मोठी उत्सुकता आहे. गेल्या दोन दशकांपासून ऐश्वर्या राय या कान्स फिल्म फेस्टिवलच्या नियमित उपस्थितांपैकी एक आहेत आणि त्यांच्या प्रत्येक लुकची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत असते.दरम्यान, सोशल मीडियावर अलीकडेच एका कॉस्मेटिक ब्रँडच्या कान्स संबंधित प्रमोशनल व्हिडिओमध्ये ऐश्वर्या यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट, वायोला डेव्हिस, ईवा लाँगोरिया आणि हेलेन मिरेन यांसारख्या ग्लोबल एम्बॅसिडर्स दिसल्या होत्या. त्यामुळे ऐश्वर्या यांचा समावेश नसल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्यांच्या फ्रान्स रवाना होण्याने त्या यंदाही कान्समध्ये उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वेळी सर्वाधिक चर्चा ऐश्वर्या राय Aishwarya Rai यांच्यासोबतच त्यांच्या मुलगी आराध्या हिच्याही लूकची होत आहे. विमानतळावर आराध्या ऑल-ब्लॅक लूकमध्ये दिसली. शर्ट, जॅकेट आणि स्लिंग बॅग अशा स्टायलिश पोशाखात ती आत्मविश्वासाने वावरताना दिसली. तिच्या या ग्लॅमरस अंदाजाचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
ऐश्वर्या राय बच्चन यांनी 2002 मध्ये ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर 2003 मध्ये त्या आंतरराष्ट्रीय कॉस्मेटिक ब्रँडच्या ग्लोबल अॅम्बेसेडर बनल्या आणि तेव्हापासून त्या जवळपास दरवर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर झळकत आहेत. त्यांच्या पारंपरिक साड्या, भव्य गाऊन आणि अनोख्या स्टाइलमुळे त्यांनी भारतीय फॅशनला जागतिक व्यासपीठावर वेगळी ओळख मिळवून दिली आहे.यंदाही ऐश्वर्या राय बच्चन यांच्या रेड कार्पेट अवताराची प्रतीक्षा जगभरातील चाहत्यांना असून, त्यांच्या उपस्थितीमुळे कान्समध्ये पुन्हा एकदा भारतीय ग्लॅमरची झळाळी पाहायला मिळणार आहे.