नवी दिल्ली,
An Exciting Contest in IPL 2026 इंडियन प्रीमियर लीग २०२६ हंगाम आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून लीग फेरीतील बहुतांश सामने पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत ६६ सामने खेळले गेले असून प्लेऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. चौथ्या स्थानासाठी मात्र अजूनही काही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.दरम्यान, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीतही मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आता सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. कोहलीने या हंगामात १३ डावांत ५४२ धावा केल्या असून त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतके आहेत. तरीही तो सध्या सहाव्या स्थानावर घसरला आहे.

ऑरेंज कॅपवर गुजरात टायटन्सचा युवा सलामीवीर साई सुदर्शनने कब्जा कायम ठेवला आहे. त्याने १४ डावांत ६३८ धावा करत शानदार कामगिरी केली आहे. या मोसमात त्याने एक शतक आणि सात अर्धशतके झळकावली आहेत. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने ५३ चेंडूंमध्ये ८४ धावांची दमदार खेळी साकारली.सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर असून त्याने ६१६ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी ५७९ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. लखनौ सुपर जायंट्सचा मिचेल मार्श ५६३ धावांसह चौथ्या, तर सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन ५५५ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
गोलंदाजांमध्ये पर्पल कॅपची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे. गुजरात टायटन्सचा कागिसो रबाडाने चेन्नईविरुद्ध तीन विकेट घेत २४ विकेट्सचा टप्पा गाठला. मात्र इकॉनॉमी रेट चांगला असल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा भुवनेश्वर कुमार अजूनही पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. दोघांच्या नावावर समान विकेट्स असल्या तरी भुवनेश्वर आघाडीवर आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा अंशुल कंबोज २१ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरातचा राशिद खान १९ विकेट्ससह चौथ्या, तर राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा आर्चर १८ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.