मुंबई
Bandra demolition पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्टेशन आणि वांद्रे टर्मिनसदरम्यान असलेल्या गरीब नगर परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेच्या मालकीच्या सुमारे ५,२०० चौरस मीटर जागेवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली असून, 150 हून अधिक संशयितांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई 19 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुरू करण्यात आली होती. प्रशासनाच्या माहितीनुसार, रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि जागा मोकळी करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. दोन दिवसांनंतर, 20 मे रोजी अतिक्रमित भागात बांधण्यात आलेल्या एका धार्मिक स्थळाच्या पाडकामावेळी मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि परिस्थिती चिघळली.
घटनास्थळी Bandra demolition जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन वेळा लाठीचार्ज करावा लागला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान मुंबई पोलीस, रेल्वे संरक्षण दल आणि रेल्वे पोलीस अशा सुमारे 1,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
१० टक्के काम बाकी
तीन दिवसांत या भागातील Bandra demolition सुमारे 90 टक्के झोपड्या हटवण्यात आल्या असून उर्वरित 10 टक्के अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, आज नमाजचा दिवस असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हायअलर्ट जाहीर केला आहे.सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओंमध्ये दगडफेक आणि त्यानंतर झालेल्या लाठीचार्जची दृश्ये दिसून आली आहेत. या घटनेत काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला असून जखमी पोलिसांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.निर्मल नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव आणि हिंसाचार अशा विविध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओंच्या आधारे इतर सहभागींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान काही लोकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून दोषींवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गस्त आणि बंदोबस्त वाढवला आहे. रेल्वे प्रशासनाच्या विकासकामांसाठी ही जमीन मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी स्थानिक विरोध आणि तणावामुळे परिसरात अद्यापही अस्वस्थता कायम आहे.